Royal Enfield च्या बाईक भारतात खूपच लोकप्रिय आहेत. त्यांचा लूक आणि परफॉर्मन्स यामुळे त्या सर्वांचं लक्ष वेधून घेतात. मात्र आता, भारतीय बाईक कंपनी TVS देखील अशी एक दमदार बाईक घेऊन येत आहे जी थेट Royal Enfield ला टक्कर देईल असं बोललं जातंय.
तुम्हालाही Royal Enfield आवडते का? पण तिची किंमत जरा जास्त वाटते का? मग काळजी करू नका – कारण TVS ची ही नवीन बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. चला तर, या नव्या बाईकबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
नॉर्टनच्या नव्या बाईक्स लवकरच भारतात
टीव्हीएस मोटर कंपनीने जाहीर केलं आहे की, ती आपल्या ब्रिटिश ब्रँड नॉर्टनची बाईक या वर्षाच्या शेवटी भारतीय बाजारात आणणार आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात 6 मे रोजी झालेल्या मुक्त व्यापार करारानंतर (FTA), कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू यांनी ही घोषणा केली. या करारामुळे ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या कार्स आणि बाइक्सवरचं आयात शुल्क आता 100 टक्क्यांवरून फक्त 10 टक्क्यांवर येणार आहे. त्यामुळे नॉर्टनच्या बाईक आधीपेक्षा स्वस्त होतील आणि ग्राहकांना अधिक परवडतील.
नॉर्टन टीव्हीच्या मालकीचे आहे का?
टीव्हीएसने 2020 मध्ये नॉर्टन ब्रँड आर्थिक अडचणीत असताना 153 कोटींना खरेदी केला होता. तेव्हापासून कंपनीनं जवळपास 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून नॉर्टनसोबत घनिष्ठ काम केलं आहे. गेल्या काही वर्षांत नॉर्टनच्या विद्यमान बाईक रेंजमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून काही नवीन मॉडेल्सही सादर करण्यात आली आहेत. सुदर्शन वेणू म्हणाले की, हा व्यापार करार कंपनीच्या वाढीस गती देईल आणि पुरवठा साखळी मजबूत होईल.
कंपनी आणणार प्रीमियम बाईक
टीव्हीएस लवकरच नॉर्टन मोटारसायकल्सच्या प्रीमियम बाईक रेंजसह भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. यामध्ये कमांडो 961, V4 SV आणि V4 CR या खास मॉडेल्सचा समावेश आहे. टीव्हीएस ही नॉर्टनच्या अशा हाय-एंड बाईक्स भारतात घेऊन येणारी पहिली कंपनी ठरण्याची शक्यता आहे.
ही बाइक्स पूर्णपणे तयार (CBU – Completely Built Units) अवस्थेत ब्रिटनमधील सोलिहल येथील नॉर्टन फॅक्टरीतून भारतात आणल्या जातील. भारतात ‘Made in India’ मॉडेल्स लॉन्च करण्याआधी, कंपनी या प्रीमियम बाईक्सचा वापर ब्रँड ओळख मजबूत करण्यासाठी करणार आहे.
याशिवाय, टीव्हीएसने आधीच स्पष्ट केलं आहे की 2027 पर्यंत 6 नवीन बाईक्स लाँच करण्याची त्यांची योजना आहे, ज्यातील काही बाईक्स भारतातच तयार केल्या जातील.
‘या’ गाड्या भारतातही येणार!
नॉर्टन सध्या 300 ते 400cc क्षमतेच्या नवीन बाईक्सवर काम करत आहे, ज्या रॉयल एनफिल्ड, ट्रायम्फ, हार्ले-डेव्हिडसन, होंडा अशा प्रसिद्ध ब्रँड्सना थेट स्पर्धा देतील. या बाईक्स केव्हा येणार याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान, म्हणजेच सणासुदीच्या काळात नॉर्टन आपल्या बाईक्स भारतात लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे.
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे (FTA) नॉर्टनसारख्या ब्रँड्ससाठी भारतात प्रवेश करणे आता अधिक सोपं झालं आहे. या निर्णयाचा ट्रायम्फ, रोल्स रॉयस, बेंटले, मॅकलारेन, लोटस, अॅस्टन मार्टिन आणि जेएलआर (Jaguar Land Rover) यांसारख्या इतर ब्रिटिश कंपन्यांनाही मोठा फायदा होणार आहे.